मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण

धातू-अधातू गुणधर्म

views

5:30
आवर्तसारणीत धातू व अधातूंची जागा कोठे आहे हे समजले आहे. मुलांनो आवर्तसारणीत आपल्याला एक नागमोडी रेषा दिसते. आपण मागे पाहिले होते की या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू व उजव्या बाजूला अधातू आहेत. तसेच या रेषेच्या किनारी भागात धातूसदृश्य मुलद्रव्ये आहेत हेही आपण पाहिले होते. परंतु हे कशामुळे झाले त्याचा अभ्यास आपण आता करूया. त्यासाठी आपल्याला धातू व अधातुंच्या रासायनिक गुणधर्मांची तुलना करावी लागेल. साध्या आयनिक संयुगाच्या रासायनिक सुत्रांवरून असे दिसते की त्यांच्यातील धनायन हा धातूपासून तर ऋणायन हा अधातुपासून बनलेला असतो. यावरून आपल्या असे लक्षात येते की, धातूंच्या अणूंची प्रवृत्ती स्वतःचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून म्हणजेच देऊन धनायन बनण्याची असते. यालाच मुलद्रव्यांची विद्युत धनता म्हणतात. याउलट अधातुंचे कार्य असते. अधातूंच्या अणूंची प्रवृत्ती ही बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची असते. अधातू बाहेरून इलेक्ट्रॉन संयुजा कवचात स्वीकारून ऋणायन बनतात. तसेच आयनांना राजवायुंचे स्थायी इलेक्ट्रॉन संरुपन असते. संयुजा कवचातून इलेक्ट्रॉन गमवण्याची व स्वीकारण्याची अणूंची क्षमता कशी ठरते? ते पाहूया. कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्यांच्यावर धनप्रभारी केंद्रकामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षण बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात. संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान आतील कवचांमधील इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉनांवर आकर्षण बल प्रयुक्त करणारा परिणामी केंद्रकीय प्रभार हा मुळच्या केंद्रकीय प्रभारापेक्षा थोडा कमी असतो. धातूंमध्ये असणारी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे 1 ते 3 असते. ह्या संयुजा इलेक्ट्रॉनांवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा कमी असतो. ह्या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून धातूंमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन गमावून स्थायी राजवायू संरुपण असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. मूलद्रव्यांच्या या प्रवृत्तीलाच धातू गुणधर्म म्हणतात. आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा आवर्ती कल स्पष्ट दिसून येतो.